शोध न्यूज : भरदिवसा आईवर हल्ला करून मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून मोहोळ तालुक्यातील एका शेतातून पोलिसांनी अटक केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी रस्त्यावर टाकळी बायपास चौकात काल आईसोबत निघालेल्या २१ वर्षे वयाच्या तरुणीला तिच्या आईच्या डोळ्यादेखत पळवून नेण्याची अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली होती. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. परीक्षा असल्याने आईसोबत ही तरुणी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात निघाली असताना पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील सागर घाडगे हा आपल्या मित्रासमवेत तेथे आला आणि त्याने या दोघींना रस्त्यात अडवले. दोघीनाही शिवागाळ करीत तरुणीच्या आईवर शस्त्राने हल्ला केला. (Kidnapped girl rescued by Pandharpur police) आई जखमी होताच तरुणीला पळवून नेण्यात आले होते. भरदिवसा आणि भररस्त्यावर ही घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त होत होती.
आरोपी हे परिचयाचे असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी फार काही कठीण बाब नव्हती परंतु तरीदेखील पंढरपूर तालुका पोलिसांनी जलद गतीने हालचाल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध लगेच सुरु केला. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस मिलिंद पाटील यांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथके तयार केली होती. सर्व मार्गाने आरोपीची माहिती मिळवली जात होती. तांत्रिक विश्लेषणाचा देखील आधार घेत त्यांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधणे सुरु केले. अखेर पोलिसांना त्यांच्या ठिकाणाचा शोध लागला. सदर आरोपी हे मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी लगेच आपला मोर्चा मोहोळच्या दिशेने वळवला आणि एका शेतातून सागर घाडगे याला त्याच्या मित्रासोबत पकडले. अपहरण केलेली तरुणी देखील त्यांच्यासोबत होती. तालुका पोलीस, सोलापूर गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस कर्मचारी यांना आरोपींचा मुसक्या आवळण्यात यश आले. अपहरण केलेल्या मुलीची देखील सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !