BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० फेब्रु, २०२३

विद्युत रोहित्रावर कामगाराचा मृत्यू, महावितरण अभियंत्यावर गुन्हा दाखल !

 


शोध न्यूज :शेतातील विद्युत रोहित्रावर काम करीत असलेल्या कामगाराचा डीपीवरच मृत्यू झाल्याच्या घटनेस जबाबदार धरून महावितरण अभियंत्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत ग्राहक, विशेषत: शेतकरी नेहमीच ओरड करीत असतात पण महावितरणला घाम आलेला अथवा हा आवाज त्यांच्या कानावर गेल्याचे सहसा दिसत नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती तर अत्यंत वेगळी आणि तितकीच चिंताजनक असते. फ्युजच्या उघड्या पेट्या जागोजागी लटकताना दिसतात तर कधी नेहमीप्रमाणे विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू ओढवतो. ठिणग्या पडून ऊस जळतो आणि शेतकऱ्याचे नुकसान होतच राहते. शेतकरी आक्रोश करीत राहतो पण त्याचा आवाज त्याच्या शिवाराच्या पलीकडे जाताना दिसत नाही. अशाच कारभारात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कंदर येथील शिवारात नुकताच विद्युत डीपीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. 


विद्युत पुरवठ्यात काही बिघाड झाल्यामुळे महावितरणकडे असलेला तरुण कंत्राटी कामगार गोविंद बाबुराव खोडवे हा कंदर येथील उजनी जलाशयाच्या जवळ असलेल्या इनामदार यांच्या शेताजवळ डीपीवर चढून काम करीत होता. काम करण्यापूर्वी त्याने रीतसर परमीट घेवून विद्युत पुरवठा देखील बंद केला होता परंतु काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाला आणि कामगाराला विजेचा धक्का बसून डीपी वरच त्याचा मृत्यू झाला. (Death of worker on electricity DP, case filed against Mahadistrivan engineer) २८ वर्षे वय असलेला हा कंत्राटी कामगार मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील येलडा गावचा होता. विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो डीपीवरच मृत्युमुखी पडला आणि काही काळ त्याचा मृतदेह तसाच डीपीवर लटकलेला होता. 


या दुर्घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी तसेच गावकरी या डीपीकडे धावले. कामगाराचा मृत्यू पाहून लोकांनी अत्यंत कडक शब्दात आपला संताप व्यक्त केला. कंदर येथे अशा प्रकारचा मृत्यू हा पहिलाच नसून त्याच गावातील असा पाचवा मृत्यू असल्याचे लोक सांगत होते. या घटनेला महावितरणला जबाबदार धरले जात होतेच परंतु अशा घटना मुद्दाम घडवल्या जातात काय ? अशी शंकाही यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. अखेर मयत गोविंद याच्या चुलत भावाने, पंडित खोडवे यांनी याबाबत करमाळा पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार संबंधित विद्युत अभियंता आणि विद्युत ऑपरेटर किशोर नागनाथ तळेकर, ज्ञानदेव तुकाराम लोकरे अशा तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या अभियंता आणि विद्युत ऑपरेटर अशा तिघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि  गावकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात आले असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यात यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त होऊ लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !