BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ फेब्रु, २०२३

विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता पुत्राचा मृत्यू !





शोध न्यूज : शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता आणि त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या त्यांच्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


शेतकरी करीत असलेल्या कष्टाची तुलना कुठल्याच कष्टाशी होत नसून त्याला अपेक्षित मोबदला देखील मिळत नसतो. शेतातील पिके वाढवताना आणि जोपासताना त्याला प्रंचड परिश्रम घ्यावे लागतात आणि दिवसाच काय, रात्रीही शेतात खपून त्याला पिकांना पाणी देण्याची तजवीज करावी लागते. अशा वेळी विविध कारणाने शेतकरी बांधवांचे प्राण धोक्यात येतच असतात पण शेतीला पाणी देण्यासाठी गेल्यावर विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे मात्र अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पित्याला वाचवताना अवघ्या सोळा वर्षे वयाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. (Farmer father son dies due to electric shock) शेतात पिकांना पाणी  देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या त्यांच्या मुलालाही जोरदार धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.


सकाळच्या वेळेस शेतातील विद्युत पुरवठा सुरु झाला म्हणून ५२ वर्षे वयाचे शेतकरी शरणाप्पा अर्जुन जमादार हे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी विद्युत मोटार सुरु करण्याचा प्रयत्न केला पण मोटार सुरु होण्याऐवजी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने ते जागीच कोसळले. त्यांच्या सोळा वर्षे वयाच्या गणेश जमादार या मुलाने ते पहिले आणि वडिलांना वाचविण्यासाठी तो धावला. वडिलांच्या मदतीला गेलेल्या गणेशला देखील विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो देखील तेथेच कोसळला. या दुर्दैवी घटनेची माहिती जमादार कुटुंबाला मिळताच सगळे कुटुंब शेतात धावले. शरणाप्पा आणि गणेश या दोघानाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्या आधीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने अवघा परिसर हळहळला असून महावितरणच्या कामाबाबत संताप व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शरणाप्पा शेती करतात आणि विद्युत पंपाने पिकांना पाणी देतात. सवयीप्रमाणे त्यांनी विद्युत मोटार सुरु करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तर जीव गेलाच, शिवाय त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !