BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑक्टो, २०२२

चार चाकी गाडीसह तरुणाचा होरपळून मृत्यू !

 



शोध न्यूज : नाशिकच्या घटनेपाठोपाठ आणखी आगीच्या काही घटना घडल्या असून सांगली येथे आज पुन्हा चार चाकी गाडीसह एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 


आजची सकाळच दुर्घटनेची बातमी घेवून आली असून खाजगी बसचा अपघात होऊन नंतर लागलेल्या आगीत आत्तापर्यंत १२ प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची ताजी बातमी आहे. नाशिक येथील घटनेने देश हादरला असतानाच इकडे सांगली जिल्ह्यातही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार चाकी गाडीला आग लागून या गाडीतच एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे ही दुर्घटना घडली असून मकबूल गौसलाजम पटेल या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर गाडी लॉक झाली त्यामुळे या तरुणाला गाडीच्या बाहेर येता आले नाही. मदतीसाठी त्याने आरडाओरडा केला पण तो आवाज ऐकायला आजूबाजूच्या परिसरात कुणीही नव्हते.  


सांगली जिल्ह्यातील बलकवडी फाट्याकडे जात असताना एका चार चाकी गाडीला अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जुना सातारा रस्त्यावर आंधळी फाट्याजवळ हा अपघात झाला आणि अपघातानंतर या गाडीने पेट घेतला. गाडीला लागलेली आग अशी भडकली की चालक मकबूल याला गाडीच्या बाहेर पडताच आले नाही. त्यामुळे पेटलेल्या गाडीतच त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. गाडीला आग लागली आणि मकबूल आत अडकला परंतु हे पहायलाही या रस्त्यावर कुणी नव्हते त्यामुळे त्याला कुणाची मदत मिळू शकली नाही आणि आतल्या आत होरपळून त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार रात्री नक्की कधी घडला हे कुणालाच समजले नाही परंतु पहाटे ही घटना दिसून आली पण तोपर्यंत सगळे काही संपले होते. 


लागलेल्या आगीत गाडी संपूर्ण जळून खाक झाली आणि तरुणाचाही मृत्यू झाला. पहाटे जेंव्हा ही गाडी काही लोकांना दिसली तेंव्हा नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. (A young man burns to death in a burning car after an accident) या घटनेने पुन्हा एकदा सांगली परिसर हळहळला आहे. तरुणाच्या कुटुंबाला या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. 


बसला दुसरी आग !

पहाटे नाशिक येथे खाजगी बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली असताना सप्तशृंगी गडावर देखील राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागली परंतु सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. भाविकांना घेवून ही बस गडावर निघाली होती आणि वाटेतच तिने पेट घेतला. वेळीच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बसला लागलेली आग भडकत गेली परंतु काही वेळेत ही आग आटोक्यात आणण्यात आली. कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त गडावर  भाविकांची गर्दी होत असून तात्पुरत्या बस स्थानकावरील शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला. यावेळी बस प्रवाशांनी भरलेली होती. आगीने रौद्र स्वरूप धारण केले परंतु काही वेळात ही आग विझविण्यात यश आले आहे.   


कुर्ला येथेही आग !

कुर्ला येथील एका उंच इमारतीला देखील आग लागण्याची मोठी घटना घडली आहे. बारा मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याने रहिवासी जीव वाचविण्यासाठी आकांत करीत होते. या घटनेत झालेले नुकसान अद्याप समोर आले नाही तथापि आज राज्यात आगीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !