BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ सप्टें, २०२२

सोलापूर - नगर रस्त्यावर भीषण अपघातात दोन ठार !


शोध न्यूज :सोलापूर - नगर रस्त्यावर झालेल्या भीषण स्वरूपाच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत, या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. 


 सोलापूर - नगर रस्त्यावरील मांदळी गावाच्या जवळ हा अत्यंत भीषण अपघात आज दुपारी झाला. कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील चौघे जण चारचाकी वाहनाने घोगरगाव येथून येत होते. स्विफ्ट कार मिरजगावच्या दिशेने निघाली होती तर मालवाहतूक करणारा ट्रक अहमदनगरच्या दिशेने निघाला होता. यावेळी कार ट्रकच्या समोरच्या बाजूला आणि दुभाजकावर जोरदार आदळली. हा अपघात एवढा भयानक होता की रस्ता दुभाजकावर कार आदळताच कारचे इंजिन गाडीपासून बाजूला फेकले गेले. यावेळी गाडीतील तरुणही गाडीच्या बाहेर फेकले गेले. 


कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील ३२ वर्षाचे नीलकंठ माने आणि ३० वर्षे वयाचे शरद पिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून धर्मराज सकट आणि सोन्या सकट हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे परंतु यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात होताच येथे आजूबाजूच्या परिसरातील तसेच रस्त्यावरून जाणाऱ्यांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती. मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. थेरगाव येथील सरपंच, मांदळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, नागमठाणचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.     


या अपघातामुळे सोलापूर- नगर रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली आणि वाहतुकीची देखील कोंडी झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली असून आता ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. (Two died in a horrific accident on Solapur-Nagar road) अपघात झाला तेंव्हा प्रचंड मोठा आवाज झाला. गाडीचे इंजिन गाडीपासून तुटून वेगळे झालेले पाहून अनेकांना या अपघाताची भीषणता जाणवली. सतत अपघात होत असून त्यात प्राण जात आहेत तरीही वाहनांच्या वेगावर कसलेच नियंत्रण येत नसल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे आणि अशा भयानक घटनेला सामोरे जावे लागण्याची वेळ येत आहे.


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !