शोध न्यूज : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घर, कार्यालयासह अन्य ठिकाणावर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
आयकर, ईडी, सीबीआय या यंत्रणांच्या धाडी अलीकडे रोजच कुठे न कुठे पडत असल्याचे पहायला मिळते परंतु आता आयकर विभागाची धाड पंढरपूर येथे पडली असून विठ्ठल कारखाना निवडणुकीत भरघोस विजय मिळवलेल्या अभिजित पाटील यांच्या विविध ठिकाणावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. पाटील यांचे घर, कार्यालय, कारखाने, पतसंस्था अशा विविध ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घवघवीत यश संपादन केले आणि या कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी मिळवले. पाटील यांनी गेल्या काही वर्षात पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला आपली दखल घ्यायला लावली आहे.
अभिजित पाटील यांच्याकडे अनेक साखर कारखाने असताना पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखाना देखील त्यांनी आता आपल्या ताब्यात घेतला आहे. पंढरपूरसह उस्मानाबाद आणि विठ्ठल सहकारी कारखाना येथेही कारवाई सुरु करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. (Income tax department raid in Pandharpur) पहाटेपासूनच आयकर विभागाने ही छापेमारी सुरु केली असून या धाडीमुळे पंढरपूर, उस्मानाबाद परिसरात खळबळ उडाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाची छापेमारी सुरु झाली आहे.
पाटील हे पंढरीतील बडे उद्योजक असून गेल्या काही वर्षातील त्यांची प्रगती अत्यंत वेगवान ठरली आहे. राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी आपला दबदबा निर्माण केला असून साखर उद्योगात त्यांचे नाव आहे. राज्यातील चार साखर कारखाने त्यांनी विकत घेतले असून विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक जिंकून त्यांनी या कारखान्यावर वर्चस्व मिळवले आहे. वीस वर्षांपासून बंद असलेला सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला आणि तो यशस्वी चालवला आहे.
राजकीय पटलावर अभिजित पाटील यांचे नाव अलीकडे प्रभावीपणे उमटले असून त्यांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे पाठबळ असल्याचे वातावरण आहे. पंढरपूरसह राज्यातील त्यांच्या अन्य कारखान्यावर देखील आयकर विभागाची ही कारवाई सुरु असून सगळीकडे छापेमारी सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !