BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जुलै, २०२२

अभिनेता प्रेम चोप्रा यांच्या निधनाची अफवा !



हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या निधनाची अफवा आज सोशल मीडियावर पसरली असून आपण जिवंत आहोत असा खुलासा चोप्रा यांनी केला आहे.


अलीकडे प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया पोहोचला असून अनेकजण कसलीही खातरजमा न करता आलेला संदेश पुढे पाठवितात. आपल्याला किती माहिती आहे हे दाखविण्याचा खोटा प्रयत्न अनेकांचा  असतो परंतु यामुळे अनेक खोटे संदेश पसरले जातात आणि आकारण संबंधिताला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना देखील आज असाच मनस्ताप सहन करावा लागला आणि आपण जिवंत असल्याचा खुलासा त्यांना करावा लागला. प्रेम चोप्रा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकाला आणि हितचिंतकांना देखील या अफवेने प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आली. कसलीही खात्री न करता आलेले मेसेज पुढे पाठविण्याच्या वृत्तीमुळे समाजात अनेक अफवा आणि खोटी माहिती पसरली जाते याचा आज पुन्हा एकदा मोठा अनुभव घ्यावा लागला आहे. 



बॉलीवूड खलनायक प्रेम चोप्रा हे ८६ वर्षांचे असून त्यांच्या निधनाची बातमी आज सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि अनेकांना धक्का देखील बसला. ही अफवा पसरल्यानंतर प्रेम चोप्रा यांना सतत फोन आणि मेसेज येत राहिले. सोशल मीडियावर आलेली माहिती खरी आहे की खोटी याची खात्री करण्यासाठी चोप्रा यांचे हितचिंतक फोन आणि मेसेज करून खात्री करून घेत होते परंतु या सगळ्याचा चोप्रा कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. (Rumors of actor Prem Chopra's death) अखेर प्रेम चोप्रा यांनीच समोर येवून आपण सुखरूप असल्याचे सांगितले तेंव्हा कुठे या अफवेला आळा बसला परंतु तोपर्यंत बराच उशीर देखील झाला होता. 


"आपण ठीक असून आपल्याला काहीही झालेले नाही, माझ्या मृत्युच्या बातमीने कुणाला आनंद मिळतोय हे समजत नाही, खूपच दु:खदायक बाब असून आता यावर मी काय बोलणार? मी ठीक आहे आणि माझे आरोग्य देखील उत्तम आहे" असे प्रेम चोप्रा यांनी म्हटले आहे. आपण हैराण असून कुणी आणि कशासाठी असे केले असेल हे समजत नाही असे देखील अभिनेते प्रेम चोप्रा यांनी म्हटले आहे. चार महिन्यापूर्वी जितेंद्र यांच्याबाबत अशीच अफवा पसरविण्यात आली होती आणि आता माझ्याबाबत ही अफवा पसरवली गेली असेही चोप्रा यांनी सांगून या अफवेबाबत नाराजी व्यक्त केली.


दिग्गज खलनायक 
प्रेम चोप्रा हे  बॉलीवूडचे दिग्गज कलावंत असून खलनायक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच त्यांना आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल साठ वर्षे ते चित्रपट सृष्टीत कार्यरत असून या काळात त्यांनी ३८० चित्रपटातून अभिनय केला आहे  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !