BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२२

पत्नीनेच केला शेतकरी नवऱ्याचा खून !

 



टेंभुर्णी : झोपलेल्या शेतकरी नवऱ्याच्या अंगावर गरम तेल ओतून पत्नीनेच 'तो' खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून याआधी भावकीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


खून करण्याचे अनेक गुन्हे नेहमी घडत असतात आणि यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरण्याचा प्रयत्न गुन्हेगार करीत असतात. हातात शस्त्र घेवून हल्ला करून जिवंत माणसांची हत्या केली जाते तर कधी अपघाताचा बनाव करून खून केला जातो. कधी कधी तर चोरट्यांनी मारले असे भासविले जाते पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सापटणे येथे मात्र वेगळीच पद्धत वापरण्यात आली आहे. झोपेत असतानाच एका शेतकऱ्याच्या अंगावर तापलेले तेल टाकून खून करण्याची ही घटना समोर आली होती. भावकीच्या वादातून हा खून झाल्याचे भासविण्यात आले होते. परंतु पोलीस तपासात या गुन्ह्याने वेगळेच वळण घेतले आहे. 


शहाजी गोविंद ढवळे हे ५५ वर्षे वयाचे शेतकरी आपली पत्नी वनिता यांच्यासह शेतातील घरी रहात होते. मध्यरात्रीनंतर वनिता या शेतात पिकला पाणी देण्यासाठी गेल्या परंतु जाताना त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. शहाजी ढवळे हे झोपलेले असल्यामुळे त्यांना उठवले नाही त्यामुळे दरवाजा तसाच उघडा ठेवला गेला. त्यानंतर काही वेळाने झोपलेले शहाजी ढवळे एकदम ओरडू लागले. त्यांच्या अंगावर कुणीतरी गरम तेल ओतले आणि त्यामुळे ते भाजले गेले. दरम्यान तेथून भावकीतील दोघे जण जात असल्याचे दिसले होते असे सुरुवातीला भासवले गेले.


भाजून गंभीर जखमी झालेल्या शहाजी यांना टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते परंतु त्यांचा मृत्यू झाला. (Murder of a farmer by pouring hot oil) जमिनीचा असलेला वाद आणि न्यायालयात सुरु असलेल्या जुन्या खटल्याच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आणि भावकीतील संतोष राजेंद्र ढवळे आणि नरसिंग राजेंद्र ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली असून सद्या हे दोघेही कोठडीत आहेत.


टेंभुर्णी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला असताना त्यांच्या संशयाची सुई मयत शहाजी यांची पत्नी वनिता हिच्याकडे फिरली. पोलिसांनी वनिताला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य बाहेर आले. पत्नी वनितानेच झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर उकळते तेल ओतून खून केला असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा तपास केला त्यामुळे पत्नीनेच पतीचा खून केला असल्याची बाब प्रकाशात आली. ६ जून रोजी घडलेल्या या घटनेचा छडा अवघ्या काही दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 


मयत शहाजी ढवळे याचे अन्य महिलांशी अनैतिक संबध होते आणि शहाजी हा पत्नी वनिताला नेहमी त्रास देत होता, शारीरिक, मानसिक त्रास देत होता. शहाजी ढवळे झोपलेले असताना वनिताने तेल गरम करून त्यात मसाला टाकला आणि शहाजी याच्या अंगावर ओतले. तोंडावर, अंगावर उकळलेले तेल टाकून ती पळून गेली आणि काही वेळाने परत येऊन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तेल टाकले असल्याचा बनाव केला. (The wife killed her husband, Another arrested) भावकीतील दोघांवर हे कृत्य केल्याचा आरोप करून स्वत: पडद्याआड राहिली पण पोलिसांनी याचा नेमका तपास केला आणि वनिता बरोबर अडकली.

 

दुसरेच अडकले !

नवऱ्याचा काटा काढण्याचे कारस्थान वनिताने केले पण या प्रकरणात दुसरेच अडकले. भावकीतील संतोष राजेंद्र ढवळे आणि नरसिंग राजेंद्र ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना तुरुंगात जावून बसावे लागले. 


साथीदारांची शक्यता

वनिताने जरी हा गुन्हा केल्याचे उघडकीला आले असले तरी तिच्या सोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत. पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग समोर येतोय याची देखील आता उत्सुकता लागलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !