BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२२

प्रमुख उमेदवारांचेच अर्ज लटकले, आज होणार फैसला !


 पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचे अर्ज अजूनही लटकले असून आता आज सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी संचालकपदाच्या २१ जागांसाठी ४०५ उमेदवारांनी ४३० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्यक्ष छाननीच्या वेळी मात्र अनेकांचे अर्ज नामंजूर झाले आहेत तर प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या आहेत. छाननीवेळी आजी माजी संचालकांचे अर्ज देखील नामंजूर झाले आहेत त्यामुळे निवडणुकीला ऐनवेळी वेगळीच कलाटणी मिळू लागली आहे. या आजी माजी संचालकांनी वेगवेगळ्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज  दाखल केले पण छाननीत ते बाद ठरल्यामुळे संचालक बनण्याचे स्वप्नं अधुरेच राहिले आहे. अभिजित पाटील, ऍड गणेश पाटील, समाधान काळे, डॉ. बी पी रोंगे, विजयसिंह देशमुख अशा अनेक प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या. 


सदर हरकतीवर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली नाही त्यामुळे आता उद्या सोमवारी यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक प्रमुख उमेदवारांनी कारखाना निवडणूकीसाठी दंड थोपटून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला पण त्यांना पहिल्याच घासला भला मोठा खडा लागला. त्यांची उमेदवारी असणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला तसा हरकतींचा देखील पाऊस पडला आहे. अनेक आजी माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज तर नामंजूर झालेच आहेत त्यामुळे संचालक बनण्याचे त्यांचे मनसुभे उधळून गेले आहेत पण ज्यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली त्यांचीही उमेदवारी धोक्यात आहे.


भाळवणी गटातून समाधान काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण त्यांची उमेदवारी वेगळ्याच पेचात अडकली आहे. काळे यांचे कधीकाळचे सहकारी असलेले पण आता अभिजित पाटील यांच्या गटात दाखल असलेले धनंजय पाटील यांनी काळे यांच्याच उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. निवडणूक लढविण्यासाठी मागील पाच गाळप हंगामात किमान तीन वेळा तरी कारखान्यास गाळपासाठी ऊस देणे आवश्यक असते परंतु समाधान काळे यानी ऊस घातलेला नसल्याचा आक्षेप आहे. समाधान काळे यांनी मात्र कारखान्यास ऊस घातल्याचा दाखला सादर केलेला आहे, हा दाखला बनावट असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अजून त्यांची उमेदवारी अंतिम झालेली नाही.    


दुसरे प्रमुख आणि बहुचर्चित उमेदवार अभिजित पाटील यांच्या उमेदवारीवर देखील मोठी हरकत घेण्यात आलेली आहे, अभिजित पाटील हे अन्य साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक असल्यामुळे त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही या प्रमुख मुद्द्यांसह अन्य काही विषयावर भालके गटाने जोरदार हरकत घेतली आहे. अभिजित पाटील यांनी कारखाना निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु केला असला तरी अद्याप त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकालात निघाला नाही.  दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला पण तरीही निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी या हरकतीवरील निकाल देखील सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. 


 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांच्या अर्जावर देखील हरकत घेण्यात आली. पाटील हे भोसे येथील कृषिराज शुगरचे कार्यकारी संचालक आहेत त्यामुळे त्यांना विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही यासह अन्य काही मुद्द्यावर अभिजित पाटील यांच्या गटाकडून ऍड. पाटील यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. याप्रकरणी देखील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले आहेत तथापि त्यावर अंतिम निर्णय येणे बाकी आहे.


देगाव येथील धनाजी घाडगे यांची उमेदवारी सुरुवातीपासून चर्चेत आली असून भालके गटातील घाडगे यांच्या अर्जावर पाटील गटाने हरकत घेतली आहे. संस्थेचे थकबाकीदार असल्याचा मुद्दा पाटील गटाने उपस्थित केला आहे. (Vitthal Sugar Factory election,
Decision pending on objectionable application) प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यात आला आहे. शनिवारी यावर अंतिम निर्णय येईल असे सगळ्यांनाच वाटत होते आणि तशी प्रतीक्षा देखील होती परंतु हा निर्णय आता आज सोमवारी होऊ शकतो. त्यामुळे कुणाला या निवडणुकीतून बाहेर पडावे लागेल आणि कुणाला निवडणूक लढण्याची संधी मिळेल यासाठी उद्यापर्यंत वाट पहावीच लागणार आहे.


यांचे अर्ज मंजूर !
निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी झाली असून हरकतीचा पाऊस पडला आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक तापू लागली आहे. अनेकांचे अर्ज आक्षेपित असताना काही प्रमुख उमेदवारांचे अर्ज मात्र मंजूर झाले आहेत.   प्रमुख उमेदवारात विद्यमान चेअरमन भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके, ऍड दीपक पवार, युवराज पाटील, बजरंग बागल, नागेश भोसले, दशरथ खळगे आदी प्रमुख उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत.   



अटींची पूर्तता नाही. 
नामंजूर झालेला बहुतेक अर्जाच्या बाबतीत अटींची पूर्तता होत नसल्याचे दिसून आले त्यामुळे बहुतेक अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मागील पाच पैकी तीन गळीत हंगामात कारखान्यास गाळपासाठी ऊस दिलेला असणे आवश्यक आहे परंतु हीच अट पूर्ण केली जात नसल्यानेच अनेक अर्ज नामंजूर झाले आहेत. अजूनही प्रलंबित असलेल्या हरकतीत काही उमेदवारांच्या बाबतीत ही हरकत घेण्यात आलेली आहे. आता यावर अंतिम निर्णय काय येतोय हे आज पाहावे लागणार आहे. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !