BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२२

'विठ्ठल' च्या निवडणुकीत हरकतीवर झाला मोठा निर्णय !


पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हरकत घेण्यात आलेल्या आणि निर्णय राखून ठेवलेल्या उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला असून अभिजित पाटील यांचा उमदेवारी अर्ज मंजूर करण्यात आला आहे तर अन्य प्रमुख अर्ज नामंजूर झाले आहेत.  


गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तशी तालुक्यातील राजकारणाला गती मिळू लागली. अनेकजण संचालक होण्याची इच्छा व्यक्त करू लागले तर अनेकांनी त्यासाठी धडपड सुरु केली. तालुक्याच्या आर्थिक मजबुतीसाठी आणि राजकीय शक्तीसाठी देखील विठ्ठल सहकारी साखर कारखाना महत्वाचा ठरत आला आहे. दिवंगत आमदार भारतनाना भालके हे या कारखान्याचे चेअरमन होते तोपर्यंत अनेकजण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते आणि सुरात सूर देखील मिसळत होते पण त्यांच्या पश्चात अनेकांना सत्तेची आशा लागली असल्याचे या निवडणुकीत दिसून येत आहे. त्यातच उमेदवार अर्जाच्या छाननीत अनेकांना संचालक बनण्याचा नाद सोडून देण्याची वेळ आली. अनेक आजीमाजी संचालकांचे उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आणि त्यांचे आव्हान निवडणुकीच्या आधीच संपुष्टात आले. 


शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली त्यावेळी अनेकांचे अर्ज नामंजूर झाले तर काहीचे मंजूर झाले. परस्पराविरोधी जोरदार हरकती आल्यामुळे काही अर्जावरील निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राखून ठेवला आणि त्या त्या उमदेवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढत गेली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टीचे आल्यामुळे ही धाकधूक सोमवारपर्यंत टिकून राहिली. (Vitthal election, decision on objectionable application) आज मात्र राखून ठेवलेल्या निर्णयाच्या अर्जावर निकाल देण्यात आला आहे.  यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, समाधान काळे, विजयसिंह देखमुख, बी पी रोंगे यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.  


निवडणुकीतील प्रमुख उमेदवार अभिजित पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप घेण्यात आला आणि शुक्रवारी देखील या हरकतीवर अंतिम निर्णय आला नाही त्यामुळे तालुक्याचे लक्ष त्यांच्या उमेदवारीकडे लागले होते. त्यांच्या विरोधकांनी हरकत घेतली असली तरी देखील पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरूच होता. पाचपैकी तीन हंगामात कारखान्याला गाळपासाठी ऊस देणे हे बंधनकारक आहे आणि पाटील यांनी अशा प्रकारे ऊस दिलेला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता परंतु अभिजित पाटील यांनी कारखान्यास ऊस घातला असल्याचा दाखलाच विठ्ठल कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालकांनी दिला आहे. 


अभिजित पाटील हे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत आणि त्यांच्याच अर्जावर मोठी हरकत घेण्यात आली होती त्यामुळे तालुक्याचे लक्ष निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अंतिम निर्णयाकडे लागलेले होते. आता पाटील यांच्या अर्जावरील हरकत  फेटाळण्यात आली असून पाटील यांच्या निवडणूक लढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अभिजित पाटील हे चार कारखान्याचे अध्यक्ष असल्याने त्यांना विठ्ठलची निवडणूक लढविता येणार नाही ही हरकत देखील फेटाळण्यात आली आहे त्यामुळे पाटील गटात प्रचंड आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 


समाधान काळे 

भाळवणी गटातून समाधान काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण त्यांची उमेदवारी वेगळ्याच पेचात अडकली. काळे यांचे कधीकाळचे सहकारी असलेले पण आता अभिजित पाटील यांच्या गटात दाखल असलेले धनंजय पाटील यांनी काळे यांच्याच उमेदवारीवर आक्षेप घेतला आणि तो मान्य करण्यात आला. निवडणूक लढविण्यासाठी मागील पाच गाळप हंगामात किमान तीन वेळा तरी कारखान्यास गाळपासाठी ऊस देणे आवश्यक असते परंतु समाधान काळे यानी ऊस घातलेला नसल्याचा आक्षेप घेतला गेला होता. समाधान काळे यांनी मात्र कारखान्यास ऊस घातल्याचा दाखला सादर केलेला आहे, हा दाखला बनावट असल्याचा आक्षेप घेण्यात आला आणि अखेर आज त्यांचाही अर्ज नामंजूर करण्यात आला.उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था आणि पणन संस्था गट यामधून समाधान काळे यांचा अर्ज वैध ठरला आहे.


अभिजित पाटील 

दुसरे प्रमुख आणि बहुचर्चित उमेदवार अभिजित पाटील यांच्या उमेदवारीवर देखील मोठी हरकत घेण्यात आलेली होती, अभिजित पाटील हे अन्य साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक असल्यामुळे त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही या प्रमुख मुद्द्यांसह अन्य काही विषयावर भालके गटाने जोरदार हरकत घेतली. अभिजित पाटील यांनी कारखाना निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु ठेवला होता आणि आज त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंजूर केला आहे.


ऍड. गणेश पाटील 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांच्या अर्जावर देखील हरकत घेण्यात आली. पाटील हे भोसे येथील कृषिराज शुगरचे कार्यकारी संचालक आहेत त्यामुळे त्यांना विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही यासह अन्य काही मुद्द्यावर अभिजित पाटील यांच्या गटाकडून ऍड. पाटील यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पाटील यांचाही अर्ज नामंजूर केला आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !