BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२२

'विठ्ठल' च्या आजी माजी संचालकांचे अर्ज नामंजूर !


 पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पुन्हा एकदा संचालक होऊ इच्छिणाऱ्या आजी माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत तर प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीतील रंगत सुरुवातीपासूनच वाढताना दिसत आहे.


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागताच तालुक्यातील अनेकजण संचालक होण्यासाठी सज्ज झाले आहेत. संचालकपदाच्या २१ जागांसाठी ४०५ उमेदवारांनी ४३० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्यक्ष छाननीच्या वेळी मात्र अनेकांचे अर्ज नामंजूर झाले आहेत तर प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या आहेत. छाननीवेळी आजी माजी संचालकांचे अर्ज देखील नामंजूर झाले आहेत त्यामुळे निवडणुकीला ऐनवेळी वेगळीच कलाटणी मिळू लागली आहे. या आजी माजी संचालकांनी वेगवेगळ्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज  दाखल केले पण छाननीत ते बाद ठरल्यामुळे संचालक बनण्याचे स्वप्नं अधुरेच राहिले आहे. अभिजित पाटील, ऍड गणेश पाटील, समाधान काळे, डॉ. बी पी रोंगे, विजयसिंह देशमुख अशा अनेक प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत याबाबत सुनावणी सुरु होती. 


समाधान काळे यांच्या अर्जावर मोठी हरकत घेण्यात आली. काळे यांचे एकेकाळचे सहकारी असलेले आणि अभिजित पाटील यांच्या गटात असलेले धनंजय पाटील यांनी ही हरकत घेतली. कारखान्याकडे गाळपासाठी ऊस दिलेला नसताना गळिताचचा बनावट दाखल सादर केला असल्याची ही हरकत आल्याने काळे यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड गणेश पाटील यांच्या अर्जावर देखील हरकत घेण्यात आली. पाटील हे भोसे येथील कृषिराज शुगरचे कार्यकारी संचालक आहेत त्यामुळे त्यांना विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही यासह अन्य काही मुद्द्यावर अभिजित पाटील यांच्या गटाकडून ऍड पाटील यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. 


निवडणुकीतील प्रमुख ऊमेदवार अभिजित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भालके गटाने जोरदार हरकत घेतली. अभिजित पाटील हे अन्य साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक असल्यामुळे त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविता येणार नाही या प्रमुख मुद्द्यांसह अन्य काही विषयावर भालके गटाने जोरदार हरकत घेतली. देगाव येथील धनाजी घाडगे यांची उमेदवारी सुरुवातीपासून चर्चेत आली असून भालके गटातील घाडगे यांच्या अर्जावर पाटील गटाने हरकत घेतली आहे. संस्थेचे थकबाकीदार असल्याचा मुद्दा पाटील गटाने उपस्थित केला आहे. (Vitthal Sugar Factory election, many applications rejected)अनेकांचे अर्ज नामंजूर झाले असले तरी अनेक अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत. 


यांचे अर्ज मंजूर !
निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी झाली असून हरकतीचा पाऊस पडला आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक तापू लागली आहे. अनेकांचे अर्ज आक्षेपित असताना काही प्रमुख उमेदवारांचे अर्ज मात्र मंजूर झाले आहेत.   प्रमुख उमेदवारात विद्यमान चेअरमन भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके, ऍड दीपक पवार, युवराज पाटील, बजरंग बागल, नागेश भोसले, दशरथ खळगे आदी प्रमुख उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत.   


भालके यांचा अर्ज नामंजूर 
सरकवली गटामधून उमेदवारी दाखल केलेले व्यंकटराव भालके यांचा अर्ज मात्र नामंजूर झाला आहे. विविध गटातून उमेदवारी दाखल केलेले अनेक उमेदवारी अर्ज छाननीत नामंजूर झाले असून ही संख्या शंभर ते दीडशेच्या आसपास गेली आहे. काही अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. 


अटींची पूर्तता नाही. 
नामंजूर झालेला बहुतेक अर्जाच्या बाबतीत अटींची पूर्तता होत नसल्याचे दिसून आले त्यामुळे बहुतेक अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मागील पाच पैकी तीन गळीत हंगामात कारखान्यास गाळपासाठी ऊस दिलेला असणे आवश्यक आहे परंतु हीच अट पूर्ण केली जात नसल्यानेच अनेक अर्ज नामंजूर झाले आहेत.  


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !