BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२२

पाहुणा आलाय ? आधी पोलिसांना कळवा !

 



सोलापूर : तुमच्या घरी पाहुणा आलाय ? चहा पाणी राहू द्या, आधी पोलिसांना कळवा ! होय, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी तसे आदेशच काढले आहेत आणि वारी पंढरपूरची असली तरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.


जुलै महिन्यात पंढरीची आषाढी वारी असून यावेळी आषाढीसाठी भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरीची कोणतीच वारी भरली नाही, त्यामुळे राज्यभरातील भाविकांना वारीचा सोहळा अनुभवता आला नाही. यावर्षी आषाढी यात्रेस शासनाने परवानगी दिलेली आहे. वास्तविक कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत, रोजची वाढ ही कालच्यापेक्षा अधिक आहे आणि मुंबईत तर उद्रेकाची परिस्थिती बनू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच कोरोनाच्या सावटात आषाढी वारी भरणार आहे. दोन वर्षे आषाढीचा सोहळा साजरा झाला नसल्यामुळे यावेळी भाविक मोठ्या संख्येने पंढरीत येण्याची शक्यता विचारात घेऊन प्रशासन कामाला लागले आहे. भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना सुरक्षा पुरविणे यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. 


वारीसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांची सुरक्षा देखील महत्वाची ठरते त्यामुळे प्रशासन त्या दृष्टीनेही तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी एक महत्वाचा आदेश काढला असून हा आदेश सोलापूर महानगर पालिका हद्द वगळता संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करण्यात आला. यात्रा कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये अथवा देशविघातक कृत्य घडू नये यासाठी ३० जून ते १३ जुलै या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात नवीन व्यक्ती राहण्यासाठी आल्यास त्याची माहिती पोलीस प्रशासनाला देणे आवश्यक आहे. (Mandatory to report guest information to the police)कोणीही व्यक्ती राहायला आली असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार असून घर मालक, फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, मंदिर, मस्जिद, खाजगी निवासस्थाने या सर्वांसाठी हा आदेश आहे. अशा ठिकाणी ओळख पटवल्याशिवाय अनोळखी अथवा संशयित व्यक्तीला राहण्यास परवानगी दिली जाऊ नये. 

 

कागदपत्रे घ्यावीत !

नवीन व्यक्तीची ओळख पटवूनच त्यांना राहण्यासाठी परवानगी दिली जावी आणि संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जावी. घर भाडेकरूकडून रहिवासी आणि ओळख असलेल्या पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति घेतल्या जाव्यात. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


होय, बंधनकारकच !

आषाढी कालावधीत जिल्ह्यात कुठेही राहायला आलेल्या व्यक्तीची माहिती पोलिसांना कळवणे बंधनकारकच असून भविष्यात होणाऱ्या एखाद्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध  होऊ शकतॊ, यामुळे सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होईल असे या आदेशात म्हटले आहे. स्फोटक, बार उडणारे पदार्थ बाळगू नयेत तसेच गॅस, रॉकेल, पेट्रोल, डिझेल याचा  वापर काळजीपूर्वक करावा आणि सुरक्षित ठिकाणी या वस्तू ठेवाव्यात असे देखील सांगण्यात आले आहे.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !