BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२२

राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक जिंकले,

 



अत्यंत नाट्यमय घडामोडीने गाजलेल्या राज्य सभा निवडणुकीत धनंजय महाडिक जिंकले असून शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील काही आमदार फुटल्याचे देखील समोर आले आहे 

काल दिवसभर राज्य सभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु होते आणि सायंकाळी निकाल अपेक्षित होता परंतु बऱ्याच नाट्यमय घटना घडत गेल्या आणि मतमोजणी सुरूच झाली नाही. अखेर ही मतमोजणी रात्री उशिरा सुरु झाली आणि पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली. राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठीच अधिक चुरस होती आणि या जागेचा निकाल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागला. सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती.  या जागेसाठीच अटीतटीचा सामना झाला आणि धनंजय महाडिक विजयी झाले. 


भाजपचे महाडिक याना ४१ मते मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार याना ३३ मते मिळाली आहेत. मिळालेली मते विचारात घेता महाविकास आघाडीतील काही अपक्ष आमदार फुटले असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही महाडिक यांचा विजय झाला आणि महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याचे उघड झाले आहे. महाविकास आघाडीला हा धक्का असून काही आमदारांची नाराजी टोकाला गेली असल्याचेच या निवडणुकीने दाखवून दिले आहे. (Rajya Sabha elections Dhananjay Mahadik won)


या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते मिळवून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगडी हे विजयी झाले.. राज्यसभेची यावेळची निवडणूक अभूतपूर्व वादळी ठरली. भाजप आणि महाविकास आघाडीने परस्परांच्या आमदारांची मते नियमबाह्य असल्याचे आक्षेप घेतले गेले आणि त्यामुळे मतमोजणी रखडली. निवडणूक आयोगाकडे तक्रारी पोहोचल्यानंतर मतमोजणी सुरूच झाली नाही आणि सगळेच आमदार, मंत्री केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पाहात बसले. मतमोजणीसाठी आयोगाकडून लवकर आदेश येत नसल्यामुळे आमदार वैतागून गेले होते. 

निवडणूक आयोगाने मतदानाचे फुटेज मागवून घेतले आणि संपूर्ण फुटेज पाहून मतमोजणी घेण्यासाठी परवानगी दिली परंतु महाविकास आघाडीचे आमदार सुहास कादे यांचे मत बाद ठरवले. २८५ पैकी २८४ मते वैध ठरविण्यात आली. एक मत बाद ठरविण्यात आल्याने रात्रभर याबाबत चर्चा सुरु होती. 

दोन मते नाहीच !
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने त्यांना मतदान करता आलेच नाही. न्यायालयाकडून परवानगी मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु न्यायालयाने मतदानासाठी दोन्ही नेत्यांना परवानगी नाकारली त्यामुळे त्यांना या मतदानात सहभागी होत आले नाही . 

आघाडीचे आमदार फुटले 
भाजपने केलेली खेळी यशस्वी ठरली असून महाविकास आघाडीतील ९ ते १० मते आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले आहे. महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा आधीपासून सुरु होत्या आणि या मतदानात ते दिसून आले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा अधिक मते मिळाली आणि सहावे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !