BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जून, २०२२

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरीत तरुणाची आत्महत्या !

 



पंढरपूर : बेकायदा सावकारीने पंढरीत आणखी एक बळी घेतला असून सावकाराच्या जाचामुळे पंढरपूर शहरातील एका तरुणाने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


पंढरपूर शहरात अवैध सावकारीची मोठी परंपरा आहे. अवाजवी व्याज दराने गरजूंना रक्कम दिली जाते आणि मनगटी शक्तीने व्याज वसूल केले जाते. घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम चुकती केली तरी देखील सावकारांचे देणे शिल्लक उरलेलेच असते आणि हे देणे कधीच फिटत नाही. अखेर व्याज देवून कंटाळलेला व्यक्ती आपल्याच आयुष्याचा शेवट करतो. अशा प्रकारच्या अनेक घटना पंढरपूर शहरात घडलेल्या आहेत. सावकाराच्या त्रासाला आणि दमदाटीला कंटाळून अनेकानी आत्महत्या केल्या आहेत. आता पुन्हा भक्ती मार्गावरील  लहू शिंगाडे या तरुणाने असेच टोकाचे पाउल उचलले आहे त्यामुळे पुन्हा एकदा पंढरी सुन्न झाली आहे. 


मयत लहू शिंगाडे यांच्या पत्नी मोनाली शिंगाडे यांनी पंढरपूर शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. पंढरीच्या भक्ती मार्गावर राहणारा लहू दिगंबर शिंगाडे हा २८ वर्षे वयाचा तरुण गवंडी काम करून उपजीविका करीत होता. त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि त्याला पैशाची गरज पडली म्हणून त्याने काळे कुटुंबाकडून २० हजार रुपयांचे कर्ज व्याजाने घेतले होते. वीस हजार रुपयांचे एक लाख रुपये झाले. 


व्याजाने घेतलेल्या वीस हजार रुपयातील तीस ते चाळीस हजार रुपये त्याने सावकाराला परत देखील केले तरीही त्याच्याकडे अजून मोठी रक्कम असल्याचे सावकाराने सांगितले. सावकार पतीपत्नीने लहूला पैशासाठी धमकावणे सुरु केले आणि पैसे देण्यासाठी सावकारी तगादा लावणे सुरु केले. बुधवारी पुन्हा एकदा सावकार महिलेने त्याला फोन केला आणि पैशाची मागणी केली. शिवाय पैसे जर दिले नाहीस तर घरी येवून मारीन असे धमकीही दिली. 


सावकाराच्या धमकीमुळे लहू शिंगाडे याने आपल्या रोजच्या कामावर जाण्याऐवजी पैशाची जुळवाजुळव करू लागला. प्रयत्न करूनही सावकाराचे पैसे देण्याचा प्रयत्न तो करीत राहिला पण तेवढ्या पैशाची व्यवस्था  तो करू शकला नाही. एकीकडे सावकारी धमकी आणि दुसरीकडे पैशाची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे त्याची मानसिक अवस्था कठीण झाली. (Threat from lender, youth commits suicide) या सगळ्या प्रकारामुळे त्याला निराशा आली होती आणि याच नैराश्यातून त्याने आपल्या घरात कुणी नसल्याची संधी साधत गळफास घेवून आत्महत्या केली. 


मृत्युपूर्वी व्हिडीओ बनवला 

लहू शिंगाडे याने गळफास घेवून आत्महत्या केली परंतु तत्पूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला असल्याचे समोर आले. या व्हिडीओमधून त्याने सावकार पती पत्नीचा उल्लेख करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आणि विनंती केली आहे. प्राप्त झालेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु केली आहे. 


व्यायामाची आवड !

कष्ट करून जगताना त्याने अनेक मित्र मिळवलेले होते. सर्वांशी आपुलकीने वागत असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. गवंडीकाम करीत असलेल्या लहूला व्यायामाची मोठी आवड होती आणि तो आपल्या मित्रांना देखील व्यायामाचे महत्व पटवून देत असायचा. उमद्या मनाचा लहू मात्र आर्थिक अडचणीत होता आणि यामुळेच त्याच्यावर दुर्दैवी वेळ आली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !