BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२२

सापळ्यातून निसटला पण आयताच सापडला !

 


माळशिरस : गुटक्याची चोरटी वाहतूक करताना पथकाला सिनेस्टाईल कट मारून पळून जाणाऱ्या पिकअपला तितक्याच शिताफीने पकडण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला यश आले. माळशिरस तालुक्यात पाठलाग करून सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


कायद्याने बंदी असलेला गुटखा सगळीकडे सर्रास मिळत असतो आणि अनेकजण तोबरे भरून पिचकाऱ्या मारीत असतात. गुटक्याला बंदी केल्यापासून तर तो चढ्या दराने विकला जातो. जादा दर आकारला जात असला तरी देखील तो विकत घेणारे शौकीन अगणित असून तरुण वर्गात गुटखा अधिक प्रिय असल्याचे दिसते. गुटख्याला मोठी मागणी असल्याने तो परराज्यातून मोठ्या प्रमाणत येत असतो. कर्नाटकमधून येणारा गुटख्याचा मोठा साठा आजवर अनेकदा पकडण्यात आला आहे. अशाच प्रकारे गुटखा पकडताना आज माळशिरस तालुक्यात पाठलागाचा थरार रंगला पण फिल्मी स्टाईलने सुरु झालेला प्रकार फिल्मी स्टाईलनेच संपुष्टात आला आहे. 


गुटखा आणि अन्य बंदी असलेले पदार्थ कटफळ कडून पिलीव मार्गाने माळशिरस तालुक्यातील मोटेवाडीकडे नेले जाणार असल्याची खबर सोलापूर अन्न व औषध प्रशासनाला लागली होती त्यामुळे या पथकाने झिंजेवाडी येथे सापळा लावला. एका पिकअप वाहनातून हा गुटखा येणार असल्याची पक्की खबर प्रशासनाला लागलेली होती त्यामुळे या वाहनाला रस्त्यातच पकडण्याचे नियोजन पथकाने केले होते. अपेक्षेप्रमाणे सदर पिकअप (एम एच ४५ टी १३२७ ) हे वाहन अत्यंत वेगाने आले. सदर वाहन दिसताच पथकाने पुढे होत या पिकअपला थांबण्याचा इशारा केला. आपले वाहन आणि गुटखा पकडला जाणार हे चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहन अधिकच वेगात दामटले आणि पथकाच्या वाहनास कट मारून पिकअप वाहन वेगाने पळून गेले. यावेळी एकाने आपली दुचाकी आडवी लावत पिकअपला पळून जाण्यासाठी मदत केली. 


डोळ्यादेखत कट मारून पिकअप पळून जाताच अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी अधिक सतर्क झाले आणि त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. या वाहनाचा शोध घेत अन्न व औषध प्रशासनाचे पथक पिकअप गेल्याच्या दिशेने धावले. मोटेवाडी येथे पोहोचल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर सदर पिकअप वाहन उभे असलेले दिसले. शोध घेत आलेल्या पथकाने त्वरित या वाहनाची तपासणी सुरु केली परंतु हे वाहन पूर्णपणे रिकामे होते. आपला पाठलाग सुरु आहे हे लक्षात आल्याने चालकाने पुन्हा एकदा चलाखी केली होती. मिळालेली खबर तर पक्की होती पण सदर वाहन तर रिकामे होते त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांपुढे आणखी आव्हान उभे राहिले होते. 


अन्न व औषध प्रशासनाने आपल्या पद्धतीने माहिती काढली असता मोटेवाडी येथील वायदंडे वस्तीवर वाहनातील गुटखा आणि अन्य पदार्थ उतरवले असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने आपला मोर्चा वायदंडे वस्तीकडे वळविला. तेथे तपासणी केली असता भिवा शंकर वायदंडे याच्या घरातील एका खोलीत हा साठा लपविला असल्याचे निदर्शनाला आले. (Chased and caught gutkha in Malashiras taluka) पथकाने ७ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.   


पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा मालक बारीकराव मोटे, गाडीतून साठा उतरवून घेवून लपऊन ठेवून आरोपीस मदत करणारे भिवा शंकर वायदंडे, भगवंत भिवा वायदंडे, महिंद्र पिकअप चालक आणि पुरवठादार अशा पाच जणांच्या विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, प्रज्ञा सुरवसे, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांच्या पथकाने ही कारवाई केली.       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !