BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जून, २०२२

छळ असह्य झाल्याने विवाहितेची विष घेवून आत्महत्या !


मोहोळ : पती, सासू आणि दिराकडून होत असलेल्या छळामुळे मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील एका विवाहित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


पैशासाठी अनेक भिक्कारछाप मंडळी सुनेचा छळ करतात आणि निरपराध सुना आपल्या आयुष्याचा शेवट करतात अशा अगणित घटना आजवर घडल्या आहेत. विशेष म्हणजे सधन घरात असे भिक्कार लोक राहतात हे देखील अनेक घटनातून समोर आले आहे. सुनेने माहेराहून पैसा आणावा अशी भिक सासू, पती मागत असतात आणि त्यासाठी आपल्याच घरातील भविष्यातील मालकिणीचा छळ सासू तर करतेच पण पती देखील आपल्या खाष्ट आईच्या सुरात सूर मिसळत असतात. 


गाडी घ्यायची, घर बांधायाचेय, पेट्रोल पंप टाकायचाय म्हणून एवढा छळ केला जातो की शेवटी तिला टोकाचे पाऊल उचलावे लागते. कितीही कडक कायदे केले तरी ही चटावलेली राक्षसी प्रवृत्ती आपल्याच घरातील सदस्याला छळत रहातात. एखाद्या मुलीशी लग्न केले म्हणजे मुलीच्या वडिलावर उपकारच केल्याची त्यांची भावना असते. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे देखील असाच प्रकार घडला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 


मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील अनिताचा विवाह कोन्हेरी येथील ब्रह्मदेव घाटूळे याच्याशी २००८ साली झाला होता. लग्न झाल्यावर काही दिवस व्यवस्थित गेले परंतु थोड्याच दिवसात सासू, पती, दिराने अनिताचा छळ सुरु केला. अनिताला अपत्य नसल्याने छळाला निमित्त झाले होते. ट्रॅक्टर घेण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून अनिताकडे तगादा लावला होता आणि त्यासाठी अनिताच्या छळ सुरु झाला होता. हा छळ असह्य झाला तेंव्हा अनिताने आपल्या माहेरी याची माहिती दिली. अखेर गावकऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अनिताच्या सासरी समजावून सांगितले आणि वाद मिटवला होता. 


प्रतिष्ठित मंडळींनी समाजावल्यानंतर हा विषय संपला असावा असे वाटत होते पण अनिताच्या छळ काहीही कमी झालेला नव्हता. अनिताला व्हायचा तो त्रास होताच होता. रोजचा हा त्रास सहन करीत अनिता सासरी नांदत राहिली पण हा त्रास एवढा वाढत गेला की तो तिला सहन करण्यापलीकडे गेला. अखेर अनिताने राहत्या घरात विषारी कीटकनाशक प्राशन केले आणि आपले जीवन संपविले. 


दोघांना झाली अटक !

अनिताने आत्महत्या केल्यानंतर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अनिताच्या पती ब्रह्मदेव पांडुरंग घाटुळे, सासू सुमन पांडुरंग घाटुळे आणि दीर शिवाजी पांडुरंग घाटुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन पती आणि सासूला पोलिसांनी अटक देखील केली आहे  




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !