BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२२

अजितदादा, पुन्हा भाजपासोबत या !



शिर्डी : पहाटेचा शपथविधी सर्वसामान्य नागरिकांच्या देखील लक्षात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत येण्याच ऑफर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्यभर आणि राजकीय पटलावर या सल्ल्याची चर्चा सुरु झाली आहे.


महारष्ट्र झोपेत असताना आणि राज्यात सरकार बनविण्याची कसरत महाविकास आघाडी करीत असताना अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून महाराष्ट्राला मोठा धक्का दिला होता. एका रात्रीत भाजपने सूत्रे हलवली आणि राज्यात अनपेक्षित सरकार स्थापन झाले होते. राष्ट्रवादीचे प्रमुख महाविकास आघाडीची जुळणी करीत असताना अजित पवार रात्रीतच भाजपच्या गोटात गेले आणि भल्या सकाळी तर शपथविधी देखील पार पडला होता. या घटनेने राजकारणात हलकल्लोळ निर्माण झाला होता आणि अजित पवार टीकेचे धनी झाले होते. अर्थात अजित पवार हे लगेच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आणि भाजपचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्या अडीच वर्षापासून सत्तेवर असताना पुन्हा एकदा अजित पवार यांनाच ऑफर देण्यात आली आहे.


महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भाजपाकडून मुहूर्त दिले जात आहेत आणि आघाडी सरकार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक मुहूर्त गेले पण सरकार काही केल्या पडले नाही तरीही पुढची तारीख देताच राहिले आणि महाविकास आघाडीने अर्धा कालावधी पूर्ण केला. सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा बेसुमार वापर केल्याचे आरोप महाविकास आघाडीने अनेकदा केले आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि शासनातील मंत्री यांच्या मागे ईडी पिडा लागलेली आहे पण सरकार मात्र मजबूतपणे सांभाळण्यात आले आहे. पण आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे अजित पवार यांना भाजपसोबत येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी जाहीर मुलाखत घेतली. या मुलाखतीत विखे पाटील यांनी अजितदादा यांना भाजपचे निमंत्रण दिले आणि सल्लाही दिला. 'अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे नेते आहेत, त्यांनी आता आमच्यासोबत परत यावे' असे विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात काही प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी पवारांना निमंत्रण दिले आहे. (BJP's invitation to Ajit Pawar)त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


मुख्यमंत्री संयमी पण --

याच मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता विखे पाटील म्हणाले. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत. चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात ते सापडले असून त्यांना बाजूला करावे' असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !