तिरुपती : भाविकांनी देवस्थानाला अर्पण केलेल्या केसातून सुमारे १२६ कोटी रुपयांचे उत्पन्न तिरुपती बालाजी देवस्थानला प्राप्त होणार आहे. बालाजी दर्शनाला येणारा भाविक मोठ्या श्रद्धेने आपले केस अर्पण करीत असतो.
श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती बालाजी देवस्थानची ओळख आहे. येथे येणारे भाविक मोठ्या रकमांचे आणि सोन्यानाण्यांचे दान तिरुपतीला करत असतात. थक्क होण्याएवढे दान एकेक भाविक करीत असतात. दर महिन्याला सुमारे दोनशे कोटींचे दान प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. सोनेनाणे आणि रोख रकमा यांच्यासह भाविकांच्या डोक्यावरील केस देखील येथे दान स्वरुपात दिले जातात. अर्थात भाविक आपले केस येथे अर्पण करीत असतात. या मागे मोठी श्रद्धा असते. केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही आपले केस येथे अर्पण करीत असतात. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले की केस अर्पण करण्याची प्रथा आहे.
भाविकांनी अर्पण केलेल्या केसातून तिरुपती देवस्थानला कोट्यावधींची कमाई होत असते. भाविकांचे केस काढण्यासाठी येथे ६०० नाभिक नियुक्त करण्यात आलेले आहेत. तिरुपती देवस्थानने आपला २०२२-२३ चा अर्थसंकल्प सदर केला आहे. प्राचीन वेंकटेश्वर मंदिराच्या प्रशासकीय मंडळाने या अर्थ संकल्पात ३,०९६.४० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंदिरातील हुंडीमध्ये एक हजार कोटी रुपये भाविकांच्याकडून येण्याची अपेक्षा आहे तर ठेवीवरील व्याजापोटी ६६८. ५० कोटी रुपये मिळतील. विविध तिकिटांच्या विक्रीतून ३६५ कोटी तर प्रसादाच्या लाडू विक्रीतून ३६५ कोटी रुपये प्राप्त होतील.
विवाह हॉल आणि निवास यांच्या भाड्यातून ९५ कोटी रुपये तर भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या विक्रीतून १२६ कोटी मिळतील असा अंदाज करण्यात आला आहे. येथे केस अर्पण केल्यास भाविकांवर लक्ष्मी कृपा होते आणि त्याची सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते त्यामुळे येथे भाविक आपले केस वाईट आणि पाप यांच्या स्वरुपात सोडतात. रोज जवळपास २० हजार भाविक तिरुपती मंदिरात आपले केस अर्पण करीत असतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !