BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ फेब्रु, २०२२

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टेज कोसळले !

 




मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टेज अचानक खाली कोसळले आणि प्रचंड गोंधळ उडाला परंतु सुदैवाने कुणाला काही दुखापत झाली नाही.


मोठे नेते आले की स्टेजवर होणारी गर्दी नेहमीच धोकादायक ठरते. त्यात राज ठाकरे यांच्यासारखा लोकप्रिय नेता येतो तेंव्हा कार्यकर्त्यांची गर्दी होत असतेच. अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर जाण्यासाठी धडपड करीत असतात आणि आयोजकांची मोठी कोंडी होत असते . अशा वेळी तात्पुरत्या स्वरुपात आणि मर्यादित संख्येचा विचार करून उभारलेले स्टेज कोसळण्याचा धोका असतो. यापूर्वी देखील अनेक ठिकाणी स्टेज कोसळून व्यासपीठावरील नेते खाली पडल्याच्या घटना घडली आहेत. गोरेगाव येथे देखील आज तशाच प्रकारची घटना घडली. 


मुंबईतील चांदिवली आणि गोरेगाव येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी राज ठाकरे या कार्यक्रमास उपस्थित होते. राज ठाकरे आल्यानंतर त्यांना जवळून पाहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यावर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. यावेळी स्टेजवर कार्यकर्त्यांनी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी केली आणि यामुळे स्टेजचा काही भाग कोसळला. स्टेज कोसळताच प्रचंड गोधळ उडाला. 


स्टेज कोसळल्याने काही महिला स्टेजच्या खालच्या भागात अडकल्या पण त्यांना त्वरीत बाहेर काढण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षा रक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले. या घटनेत कुणालाही काही दुखापत झाली नाही पण अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळ मात्र उडाला. राज ठाकरे यांनी या परिस्थितीत माईक हातात घेतला आणि कार्यकर्त्यांना गोंधळून न जाण्याचे आवाहन करीत शांत केले. खाली पडलेल्या महिलांना मनसे सैनिकांनी सुखरूपपणे बाहेर काढले. 


अचानक हा प्रसंग घडला पण सुरक्षा रक्षक, पोलीस आणि जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखले त्यामुळे राज ठाकरे यांना देखील कसलीही दुखापत झाली नसून ते पूर्ण सुरक्षित असल्याचे पक्षाचं वतीने देखील सांगण्यात आले. काही वेळेनंतर गोंधळ शांत झाल्यावर कोसळलेल्या स्टेजवरूनच राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अशा घटनावरून कार्यकर्त्यांनी बोध घेणे आवश्यक असून व्यासपीठावर चढण्याची प्रत्येकाची हौस आपल्या लाडक्या नेत्यांच्या अंगलट येऊ शकते याचाही विचार त्यांनी करणे आवश्यक आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !