श्रीगोंदा : भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नातवास पाहताच आजोबांनी देखील आपला जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना पाहून अवघे श्रीगोंदा हळहळले आहे.
ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागच्या बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. आपल्या केशव सायकर (वय २२) या काष्टी येथील मित्राला सोडण्यासाठी राहुल सुरेश आळेकर (वय २२, रा. श्रीगोंदा) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८, रा. श्रीगोंदा) हे कार घेऊन काष्टी या गावी निघाले असताना हा अपघात झाला.
भरधाव वेगाने निघालेल्या कारने ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन तिघेही मित्र जागीच ठार झाले. ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावलेला नसल्याने कार चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज आला नाही त्यामुळे थेट कार ट्रॉलीवर जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात घडला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राहुल आळेकर या तरुणाचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वीच नातेवाईक आणि मित्रांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. राहुल आळेकर याच्या अंत्यविधीसाठी आलेल्या आजोबांना (आईचे वडील ) राहुलच्या अपघाती निधनाचा धक्का सहन झाला नाही. घारगाव येथील ६३ वर्षे वयाचे आजोबा जालिंदर शिंदे हे अंत्यविधीसाठी म्हणून कसेतरी सावरत आले पण राहुलचा मृतदेह पाहून हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले पण हा धक्काच एवढा मोठा होता की त्यांचा प्राण वाचला नाही.
तिघेही एकुलती मुले !
ऐन तारुण्यात गेलेली तीनही मुले त्यांच्या आईवडिलांना एकुलती एक होती. तिघेही शिक्षण घेत होते. यातील राहुल आळेकर हा माजी नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्या भावाचा मुलगा होता आणि तो अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. अत्यंत खेळकर स्वभावाची मुले असल्याने त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. राहुल आळेकर याच्यावर आळेकर मळा येथे तर खेतमाळीस याच्यावर पारगाव रोड आणि सायकर याच्यावर काष्टी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक अपघात, चार मृत्यू !
एका अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला होता पण आजोबांचाही मृत्यू झाल्याने एका अपघातामुळे मृत्यूझालेल्यांची संख्या चार झाली आहे. आपल्या एका मित्राला त्याच्या गावी सोडण्यासाठी निघालेल्या दोन मित्रासह तिघांचाही मृत्यू झाल्याने श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तीनही तरुण मित्र असून दोघांचे वय २२ तर एकाचे वय अवघे १८ वर्षांचे आहे. या घटनेने श्रीगोंदा आणि काष्टी गावावर अक्षरश: शोककळा पसरली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अत्यंत बेपर्वाईने ट्रॅक्टर वापरतात आणि चालवतात त्याबद्धल प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !