
शोध न्यूज : एका घड्याळामुळे भाजप आमदार आणि त्यांचे पुत्र गोत्यात आले आणि आमदार पुत्राने लाखोंची लाच घेतलेला पुरावा हाती आला आहे. आमदारपुत्राला अटक देखील करण्यात आली आहे.
इतर पक्षापेक्षा वेगळे असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आमदारांच्या घरात कोट्यावधीचे घबाड सापडले असून आमदारपुत्र चाळीस लाखाची लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. कर्नाटक राज्यातील आमदार मदल विरुपक्षाप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार याला ४० लाखांची लाच घेताना नुकतेच पकडले असून लोकायुक्तांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आमदार असलेल्या त्याच्या वडिलाच्या 'कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड' या बंगळूरू येथील कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप आमदार मदल विरुपक्षाप्पा हे मुख्य आरोपी असले तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. चाळीस लाखांच्या लाचेचे हे प्रकरण असले तरी प्रत्यक्षात १.२ कोटी रुपयांची लाच मागितली असल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकाने केला आहे. त्यातील चाळीस लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त यांनी आमदार पुत्राला पकडले आहे. श्रेयस कश्यप यांना कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडला तेल पुरवण्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी त्यांच्या कंपनी केमिक्सिल कॉर्पोरेशन आणि सहयोगी फर्म डेलिसिया कॉर्पोरेशनने लाच दिली होती.
भाजप आमदाराचा पुत्र लाखोंच्या लाचेत अडकल्यामुळे आणि भाजप आमदारांना देखील यात मुख्य आरोपी केले असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेलीच आहे पण व्यावसायिकाच्या हुशारीमुळे आमदारपुत्राच्या या लाच प्रकरणात मोठा पुरावा हाती आला आहे. आमदार पुत्राच्या कार्यालयात जाताना मोबाईल तसेच अन्य डिव्हाईस बाहेरच काढून घेतले जातात एवढी कडेकोट काळजी घेतली जाते त्यामुळे येथे घडणाऱ्या घटनेचे पुरावे उपलब्ध होणे ही सामान्य बाब नाही. अशा व्यवस्थेतही संबंधी व्यावसायिकाने केलेली युक्ती कामाला आली आणि मोठे लाच प्रकरण उघडकीस येऊ शकले आहे. आमदारपुत्राच्या कार्यालयात जाण्यापूर्वी बाहेरच तपासणी होते आणि खिशातील मोबाईल आणि अन्य काही डिव्हाईस असल्यास काढून घेतले जाते हे माहित असल्यामुळे या व्यावसायिकाने लाच देताना आधीच काळजी घेतली आणि बरोबर फास आवळला आहे.
परिस्थितीचा अभ्यास करून सदर व्यावसायिकाने लाच देण्यासाठी जात असताना हातात एक स्मार्ट घड्याळ घातले होते आणि या घड्याळात एक गुप्त कॅमेरा लावलेला होता. आत जाताना त्यांचा मोबाईल बाहेर ठेवण्यास भाग पाडले परंतु हातातील घड्याळ मात्र त्यांच्यासोबत राहिले. लाच देताना आणि आमदार पुत्र लाखोंची लाच घेत असताना सगळे चित्रण आणि आवाज या कॅमेऱ्याने टिपला. एकूण घटनेचे सगळेच चित्रण आवाजासह झाल्यामुळे एक मोठा पुरावाच उपलब्ध झाला आहे आणि यामुळे आमदार पुत्राला थेट तुरुंगात जाऊन बसावे लागले आहे. या कारवाई नंतर प्रशांतकुमार याच्या कार्यालयातून २ कोटी आणि आमदार मदल विरूपाक्षाप्पा यांच्या घरातून ६ कोटी १० लाख ३० हजार एवढी बेहिशोबी रक्कम अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. ८ कोटींचे हे घबाड पाहून अधिकारी आणि सामान्य नागरिक देखील अवाक होऊन या घटनेकडे पाहत आहेत.
भ्रष्टाचारापासून दूर असल्याचे ढोल भारतीय जनता पक्षाकडून सतत वाजविण्यात येत असतात आणि त्याच पक्षाचा आमदाराकडे एवढी मोठी रक्कम सापडते आणि आमदार पुत्र लाखोंची लाच घेताना पुराव्यानिशी सापडतो हे सगळेच धक्कादायक मानले जात आहे. "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" असे सांगत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षातील आमदाराच्या घरात सापडलेले हे घबाड आणि लाचखोरीच्या प्रकरणात झालेली अटक याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (Bribery case .. A watch played the 'game' of BJP MLA's son) सामान्य नागरिक देखील थक्क होऊन या प्रकरणाकडे पाहात आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदारांचे देखील नाव आहे पण त्यांना मात्र अद्याप अटक झालेली नाही. आमदारांच्या वतीने ही लाच घेण्यात आली असल्याचे अधिकारी सांगत आहेत तर आपला काही संबंध नाही असे आमदार सांगत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !