शोध न्यूज : रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
उजनी धरणात यावर्षी चांगला जलसाठा झाला असून सद्या धरणात १११ टक्के पाणी साथ आहे. रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून कधी पाणी सोडले जातेय याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असतानाच आज कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रब्बी पिकांसाठी उजनीतून पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सोडले जाणार आहे. तसेच २५ मार्च ते २५ एप्रिल आणि तेथून पुढे २० मेपर्यंत एकच मोठे आवर्तन सोडले जाईल. त्यावर कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय होणार आहे.
उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून १५ जानेवारीपासून रब्बी आवर्तन सोडण्यात येणार असून भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर पासून २० जानेवारी पर्यंत रब्बी आवर्तन, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी पासून पाणी सोडण्यात येईल. सीना माढा उपसा सिंचन आणि दहीगाव उपसा सिंचनसाठी ५ जानेवारीपासून पाणी सोडण्याचे निश्चित करण्यात आले. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका तसेच भीमा काठावरील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी हेळळी बंधाऱ्यापर्यत पाणी सोडण्यात यावे असाही निर्णय या बैठकीत झाला आहे.
वाढते सिंचनक्षेत्र आणि जलसंपदा विभागाकडे असणारे मर्यादित मनुष्यबळ यामुळे व्यवस्थापन आणि पाणीपट्टी वसुली करणे पाटबंधारे खात्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. त्यामुळे हे व्यवस्थापन साखर कारखान्यानाकडे हस्तांतरित करण्याच्या पर्यायाचा अवलंब करावा अशी सूचना सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानुसार सीना माढा उपसा सिंचन योजना आणि दहीगाव उपसा सिंचन योजना याबरोबरच भीमा, सीना आणि माण नदीवर असलेले पन्नास को. प. बंधारे हे साखर कारखान्यांकडे व्यवस्थापनासाठी हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर केला जाईल असे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ यांनी यावेळी सांगितले.
उजनी धरणातून ३० जून पर्यत चार आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी चारऐवजी पाच आवर्तने देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येईल त्यावेळी काही दिवस नदीकाठी असलेल्या गावाच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात यावा अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या आहेत.(Water will be released from Ujani Dam in the month of January) रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासंदर्भात पुढील महिन्यात पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यामध्ये पाणी सोडण्याचे अंतिम निर्णय होणार आहे. अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत धीरज साळे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !