पंढरपूर : पोलीस असल्याची बतावणी करीत पंढरपूर शहरात पुन्हा एकदा एका भामट्याने महिलेचे दागिने लुटल्याची घटना घडली असून पोलीस असल्याच्या बतावणीने ( Fake Police) या आधी देखील अशाच प्रकारचे फसवणूक आणि लुट केली आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात वाढत्या चोरींच्या घटनामुळे नागरिक दडपणाखाली आहेत. घराला कुलूप दिसले की घर फोडले जात असल्याच्या अनेक घटना पंढरपूर शहर आणि तालुक्यात देखील घडल्या आहेत पण भर रस्त्यावर देखील फसवणूक करून लुटमार केली जात आहे त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पोलीस असल्याची बतावणी करीत याआधी देखील पंढरपूर शहरात फसवणूक करून लुट केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि त्याची चर्चाही झाली आहे. तरीही काही जण अशा बतावणीला फसत असून लुटले जात आहेत . नागरिक जर सावध राहणार नसतील तर पोलिसांनी तरी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुक्मिणी नगर, पंढरपूर येथील स्वाती ज्ञानेश्वर साळुंखे या भर दुपारी अरिहंत पब्लिक स्कूलच्या परिसरातून आपल्या घराकडे निघाल्या होत्या. या दरम्यान दुचाकीवरून दोन भामटे त्यांच्याजवळ आले आणि आपण पोलीस असल्याची बतावणी त्यांनी केली. 'या परिसरात चोऱ्या होत असून तुमच्या अंगावरचे दागिने काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा' भामटा सल्ला त्यांनी दिला. स्वाती साळुंके यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत दागिने काढले आणि आपला पर्समध्ये ठेवले. भामट्यांनी त्यांची पर्स आपल्या हातात घेतली आणि दागिने ठेवले आहेत की नाहीत याची खात्री केल्यासारखे करून पर्स पुन्हा परत दिली. (Pandharpur Crime) त्यानंतर हे भामटे निघून गेले आणि स्वाती साळुंखेही आपल्या घराकडे गेल्या.
घरी आल्यावर स्वाती साळुंके यांनी आपली पर्स उघडून पहिली असता त्यांचे दीड लाखांचे दागिने गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्समध्ये दागिन्याऐवजी दगड पाहून त्यांना धक्काच बसला आणि आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी तर केलीच पण हातचलाखी करीत पर्समधील दागिने कधी काढून घेतले हे लक्षात देखील आले नाही. हा सर्व प्रकार जवळच्या एका इमारतीतील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला असून या घटनेत एकूण तीन भामटे असल्याचे दिसत आहे. (The woman was robbed by fake police) पंढरपूर शहर पोलिसात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !