शेगाव : भरपूर नोटा मिळविण्याचे स्वप्नं पाहत भुरटा चोर थेट एटीम मशीनच फोडायला गेला पण मशीनमधून पैसे बाहेर यायच्या आधी पोलिसच आत आले आणि भुरट्या चोराला गजाआड जाऊन बसावे लागले.
अलीकडे विविध बँकांच्या एटीमवर चोरांचा डोळा असून एटीम मशीन फोडण्यापासून मशीनच पळवून नेण्यापर्यंत अनेक घटना सातत्याने घडत आहेत. बँकाकडून एटीम मशिनच्या सुरक्षेची सगळी खबरदारी घेतली जाते तरी देखील चोर एटीम मशीनमधील लाखोंच्या नोटांच्या मोहात पडतात. स्फोट घडवून मशीन फोडण्यापर्यंत देखील यांची मजल गेली आहे त्यामुळे एटीम मशिनच्या सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाते पण सराईत गुन्हेगार ही सुरक्षा भेदून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. सराईत गुन्हेगाराचे अनुकरण करायला गेलेला एक भुरटा चोर मात्र ऐनवेळी फसला आणि पोलिसांच्या तावडीत अडकला.
शेगावच्या सेन्ट्रल बँकेच्या एटीम केंद्रात रात्रीच्या वेळी हा भुरटा शिरला आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण टिपले जाऊ नये याची त्याने सर्वप्रथम दक्षता घेण्याचा प्रयत्न केला. या कॅमेऱ्यात आपला चेहरा दिसू नये म्हणून त्याने आधीच तयारी केली होती. सोबत घेऊन आलेला स्प्रे त्याने कॅमेऱ्यावर मारला आणि एटीएम मशीन फोडण्याचे काम सुरु केले. आपण कॅमेऱ्यात येत नसल्याची त्याची खात्री झाली आणि त्याने मुक्तपणे एटीएम मशीन फोडणे सुरु केले. रात्रीची वेळ असल्याने बँक बंदच होती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दिसत नाही हे पहायलाही कुणी नव्हते. त्यामुळे शांतपणे त्याने आपला चोरीचा उद्योग सुरु ठेवला होता.
बँक बंद असली तरी शेगावच्या एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण अकोला येथील आयटी विभागात सुरु होते. शेगावच्या बँकेच्या एटीएम केंद्रातील कॅमेरा काही दाखवत नाही हे अकोल्याच्या आयटी विभागातील अधिकाऱ्याच्या लक्षात आले. नेमके काय घडतेय हे दिसत नसले तरी काहीतरी गैरप्रकार असावा अशी शंका त्यांना आली. त्यांनी लगेच सेंट्रल बँकेच्या शेगाव शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला आणि समोर दिसत असलेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला. या व्यवस्थापकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. रात्रीच्या वेळी एटीएम केंद्रात काही गडबड असल्याचे पोलिसांच्या कानावर येताच पोलिसांनी देखील जरासाही वेळ न घालवता सदर एटीएम केंद्राकडे धाव घेतली.
मुदलियार कॉम्प्लेक्सच्या खालच्या गाळ्यात असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम सेंटरकडे पोलीस गेले. एटीएम सेंटरमध्ये पोलिसांनी प्रवेश केला तेंव्हा हा भुरटा चोर एटीएम मशीन फोडण्यात दंग होता. मशीनचा दरवाजा तोडून त्यातील नोटा घेण्याचा त्याचा प्रयत्न होता पण मशिनमधून नोटा बाहेर यायच्या आधीच पोलिसच आत आले आणि जागेवर त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. हा भुरटा चोर शेगाव येथीलच असून शेख मोहम्मद शेख हुसेन असे याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शेख याच्या मुसक्या बांधून पोलीस ठाण्यात आणला आणि त्याची रवानगी गजाच्या आड केली. शेगावच्या कॅमेऱ्याची छेडछाड अकोल्यात एका अधिकाऱ्याने पाहिले आणि एटीएम फोडताना चोर रंगेहात सापडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !