BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२२

'किरण 'लोहारां'कडे सोनेरी' पावत्या,, सापडले मोठे घबाड ?




शोध न्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता सापडली असल्याचे सांगण्यात येत असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आणखी मालमत्तेचा शोध सुरु आहे. 


शिक्षकांना आदर्शतेचे कथित धडे देणारे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे वादग्रस्त म्हणून आधीपासूनच चर्चेत आलेले अधिकारी होते परंतु लाच घेताना ते रंगेहात सापडले आणि या चर्चेला अधिक उधाण आले आहे. ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्या प्रकरणात किरण लोहार अधिक चर्चेत आले होते आणि मोठ्या वादात गुरफटले होते. आपण शिस्तप्रिय अधिकारी आहोत असे सतत भासवत असलेले लोहार लाचलुचपत प्रकरणी सापळ्यात अडकले आणि तेथून थेट तुरुंगात गेले. त्यानंतर मात्र त्यांच्या एकेक 'लिला' चर्चेत येऊ लागल्या आहेत. डोळे विस्फारातील अशा एकेक कथा समोर येऊ लागल्या असतानाच त्यांची अमाप मालमत्ता उघडकीस येऊ लागली आहे. मोठे घबाड हाती लागले असून आणखी मालमत्तेचा शोध घेणे सुरु आहे. 


शिक्षणाधिकारी म्हणून ९ वर्षांपूर्वी रुजू झालेल्या किरण लोहार यांच्याकडे मोठी मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी त्यांची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कोल्हापूर येथील घरी झडती घेतली असता कोट्यवधीच्या सोने खरेदीच्या पावत्या सापडल्या आहेत. या पावत्या मिळाल्या असल्या तरी ते सोने मात्र अद्याप मिळालेले  नाही.  लोहार यांना अटक झाल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली परंतु आणखी कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मात्र लोहार यांची व्यक्तिगत मालमत्ता शोधण्याचे आणि माहिती मिळविण्याचे काम मात्र सुरु ठेवले आहे. 


किरण लोहार हे १९९३ - ९४ साली शिक्षण विभागात दाखल झाले आहेत.  २०१३ साली शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेथे जेथे त्यांनी नोकरी केली आहे त्या ठिकाणी त्यांची काही मालमत्ता आहे काय ? याचा देखील शोध घेतला जात आहे. दरम्यान लोहार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अनेक फ्लॅट, प्लॉट, चाळीस ते पन्नास एकर शेती असे बरेच घबाड असण्याच्या शक्यतेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती येऊ लागली आहे. त्यामुळे लोहार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. (Education officer Kiran Lohar has properties worth crores) ३१ ऑक्टोबर रोजी लोहार याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यापासून अधिकारी त्यांच्या मालमत्तेचा शोध घेत आहेत. त्याविषयी माहिती संकलित करीत आहेत. 


सोने आहे तरी कुठे ?

लोहार यांच्या कोल्हापूर येथील घरी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून तपासणी केली असता मालमत्तांची कागदपत्रे, कोट्यवधी रुपयांचे सोने खरेदीच्या पावत्या मिळाल्या आहेत पण पावतीवरील सोने मात्र अधिकाऱ्यांच्या हाती लागले नाही. याबाबतचा अहवाल कोल्हापूर एसीबीने सोलापूर एसीबीकडे पाठवला आहे. पावत्या मिळाल्या मग सोने कुठे आहे ? हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला असून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कसून प्रयत्न अधिकारी करीत आहेत. हा तपास पूर्ण झाल्यावरच याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.


कोट्यवधींची मालमत्ता !

लोहार हे ९ वर्षांपूर्वी शिक्षणाधिकारी झाले असून त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. लोहार यांच्याकडे पाच ते सहा चार चाकी गाड्या आणि सात दुचाकी असून कोल्हापूर येथे दोन फ्लॅट आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे. याशिवाय पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणीही त्यांची मालमत्ता असल्याचे उघड होऊ लागले आहे. अद्याप याबाबत पूर्ण स्पष्टता आलेली नसून त्यांच्याकडे जर अशी मालमत्ता सापडली असेल आणि ती बेहिशोबी असेल तर मात्र लोहार यांची अडचण वाढू शकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !